एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, डहाणू अंतर्गत एकमेव मुलींची शाळा म्हणजे पीएम श्री शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळा, वरवाडा ता.तलासरी जि.पालघर या शाळेचं स्थान राष्ट्रीय महामार्ग 48 लगत डोंगर पायथ्याशी निसर्गरम्य वातावरणात वसलेली सुंदर शाळा. निसर्ग ही एक अशी शक्ती आहे. जी आपल्याला कल्पनेच्या जगात घेऊन जाते. निसर्गावर प्रेम करणे, पाणी, पर्यावरण रक्षण व व्यवस्थापनाचे धडे विद्यार्थांना दिले जातात. शिक्षक सहकारी व विद्यार्थीनीच्या सहकार्याने वृक्षरोपन, रोपवाटिक, स्वच्छता, पाणी बचत बाबत मुलांना मार्गदर्शन करतात. निसर्ग हा खऱ्या ज्ञान स्रोत असून निसर्गरम्य वातावरणात शाळेची सुंदर इमारत खेळाचे झलकारी बाई स्टेडियम मुली मनसोक्त खेळ खेळतात.शारीरिक मानसिक थकवा नाहीसा करणारे शाळेचे मैदान क्रांतिकारी बिसरामुंडा बाल उद्यान मुलींच्या मनोरंजनासाठी झोके, घसरपट्टी, कसरतीसाठी विविध साधने आहेत. फळझाडे काजू,केळी, पेरू, पपई, फणस व सिताफळ आहेत. रस्त्याच्या दुतर्फ शोभिवंत रंगीबेरंगी फुले, शालेय कार्यक्रमात गुच्छ, फुले पानापासून रांगोळी, पक्ष्यांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध व्हावे म्हणून झाडाखाली कृत्रिम पाणवठे आहेत. सुसज्ज अशी शालेय इमारत. मुलांच्या विविध कलागुणांना प्रोत्साहन त्यांच्या व्यक्तीमत्व विकास व्हावा असे निसर्गरम्य वातावरणात मुली आनंदाने शिक्षण घेत आहेत. निसर्गाच्या सानिध्यात राहून मुलींना निसर्गाचे संवर्धन करण्याची प्रेरणा मिळत आहे. निसर्गरम्य शाळा बनवण्याचे श्रेय शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री. सुरेश इभाड सर शाळेतील सर्व शिक्षक सहकारी व निसर्गप्रेमी विद्यार्थिनी यांचे योगदान महत्वाचे आहे.
“ही आवडते मज मनापासुनी शाळा, लाविते लळा ही, जसा माऊली बाळा” प्र.के.अत्रे यांच्या कवितेतील ओळी प्रमाणे मुलींना आई प्रमाणे चांगले संस्कार करून एक चांगली व्यक्ती घडवणारी एक वास्तू. शाळेची स्थापना १३ डिसेंबर १९७९ रोजी झाली. त्यापूर्वी वरवाडा गावामध्ये आश्रमशाळा नव्हती. पूर्वी ही शाळा कुडाच्या घरामध्ये भरवण्यात येत होती.हळूहळू मुलीना शिक्षणाची ओढ निर्माण झाली. व एक सुसज्ज शाळेची निर्मिती झाली. ज्या विद्या मंदिरात आपण ज्ञानार्जनाचे कार्य करत असतो. त्या मंदिराचा म्हणजे आपल्या वरवाडा विद्या मंदिराचा 45 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. या दिवशी शाळेचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वात प्रथम विद्या मंदिराचे पूजन करण्यात आले. त्यानंतर इयत्ता पहिली ते बारावीच्या या वर्गातील मॉनिटर विद्यार्थिनींना (ज्ञानसागरांना) स्टेजवर बोलावून त्यांचं औक्षण करण्यात आले. इयत्ता बारावीच्या विद्यार्थिनीनी शाळेविषयी सुंदर असे गीत गायले. त्यानंतर शिक्षकांनी मुलींना शाळेविषयी माहिती दिली. शाळा वर्धापन दिना निमित्त पहिली ते बारावी मॉनिटर च्या हस्ते केक कापून आनंद साजरा करण्यात आला.शिक्षकांचे आणि विद्यार्थ्यांचे तोंड गोड करण्यात आले. शाळेची इमारत भव्य दिव्य असून इयत्ता पहिली ते बारावी पर्येंत 1002 विद्यार्थिनी शिक्षण घेतात. या शाळेमध्ये जुनियर कॉलेज असून सायन्स आणि आर्ट्स या शाखा आहेत.प्रत्येक तुकडीसाठी स्वातंत्र्य वर्ग असून तो सर्व सोयींनी सुसज्ज आहे. शाळेत वाचनालय, संगणक वर्ग तसेच प्रयोग शाळेची अत्यंत चांगल्या तऱ्हेने स्वतंत्र सोय केलेली आहे. शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक व इतर कर्मचारी वर्ग सतत शाळेच्या प्रगतीसाठी झटताना दिसतात. शाळेचे व्यवस्थापन अतिशय शिस्तबद्ध आहे .