पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यात, गोलेरी डोंगराच्या कुशीत वसलेले वरवाडा गाव… निसर्गाच्या सान्निध्यात ज्ञानाची ज्योत अखंड प्रज्वलित ठेवणारी पीएम श्री शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळा, वरवाडा गेली ४६ वर्षे आदिवासी विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासाचे पवित्र कार्य निष्ठेने करीत आहे.
भव्य, सुसज्ज व उंच इमारत, स्वच्छ व रमणीय परिसर आणि शांत वातावरण ही शाळेची वैशिष्ट्ये आहेत. इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंत कला व विज्ञान शाखांमध्ये दर्जेदार शिक्षण येथे दिले जाते. शैक्षणिक वर्ष २०२५–२६ मध्ये ११२३ विद्यार्थिनी ज्ञानार्जन करत असून शाळेची निवड पीएम श्री योजनेअंतर्गत झालेली आहे. तसेच शाळेस ISO नामांकन प्राप्त झालेले आहे, ही अभिमानाची बाब आहे.
शाळेच्या दर्शनी भागात लावलेली गुणवंत विद्यार्थिनींची यादी उज्ज्वल निकालांची सशक्त परंपरा अधोरेखित करते. शैक्षणिक प्रगतीसोबतच विद्यार्थिनींच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी खेळ, क्रीडा, कला, नृत्य, विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, सण-उत्सव व जयंती उत्साहात साजऱ्या केल्या जातात. प्रत्येक उपक्रमात विद्यार्थिनी आत्मविश्वासाने व आनंदाने सहभागी होतात.
विद्यार्थिनींमध्ये प्रेरणा, आत्मसन्मान व नेतृत्वगुण निर्माण करण्यासाठी Student of the Month, Student of the Year, Smart PT, वाढदिवस साजरे करणे असे नाविन्यपूर्ण उपक्रम सातत्याने राबविले जातात. शाळेतील परसबागेत पिकविलेल्या ताज्या फळे-भाज्यांचा आस्वाद विद्यार्थिनी घेत असून, त्यातून पर्यावरण जाणीव व स्वावलंबनाची भावना रुजविली जाते. बालमनासाठी स्वतंत्र बालउद्यान ही विशेष सोय उपलब्ध आहे.
शैक्षणिक वर्ष २०२४–२५ मध्ये एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, डहाणू अंतर्गत कला शाखेत प्रथम क्रमांक, शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये उज्ज्वल यश, क्रीडा क्षेत्रात राज्यस्तरीय यश, तसेच सांस्कृतिक स्पर्धांमध्ये प्रकल्प स्तरापर्यंत भरारी करत विद्यार्थिनींनी शाळेच्या यशात भर घातली. या सर्व यशस्वी विद्यार्थिनींसाठी विशेष कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला.
या यशामागे शाळेतील कर्तव्यदक्ष, कार्यक्षम, सृजनशील, उपक्रमशील व समर्पित शिक्षकवृंद यांचे अमूल्य योगदान आहे. शिक्षक विद्यार्थिनींना शैक्षणिक मार्गदर्शनाबरोबरच समुपदेशन व जीवनमूल्यांचे संस्कार देतात. निरागस, शिस्तप्रिय, आज्ञाधारक, बहुगुणी व नवनवीन शिकण्याची जिद्द असलेल्या विद्यार्थिनी हीच शाळेची खरी ओळख आहे.
विद्यार्थिनींच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी अधीक्षक व अधिक्षिका यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविले जातात. ‘आरोग्य धनसंपदा’ या विषयावर व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे. शाळेचा परिसर स्वच्छ, सुंदर व सुरक्षित ठेवण्यासाठी कर्मचारी वर्ग सदैव सज्ज असतो.
ज्ञान, शिस्त, संस्कार आणि आत्मविश्वास यांच्या बळावर उज्ज्वल भविष्य घडवणारी शाळा म्हणजेच –
पीएम श्री शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळा, वरवाडा ता. तलासरी जि. पालघर
🌐 WebSite Developed by: Mr. Angad Kadam
Hon.Minister , Tribal Development
Hon. Minister of State, Tribal Development Department
Secretary, Tribal Development Department
Commissioner Tribal Development Department, Govt. of Maharashtra
Additional Commissioner Tribal Development Department, Thane
Project officer and Assistant District Magistrate , Dahanu
HeadMaster , PM Shri Govt. Girl's Ashram School , Varwada
Photos